महात्मा गांधी जयंतीनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) यांच्या तर्फे या ’ सायकल्स फॉर चेंज ’ सायकल रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी यांनी साधे जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा दिली आहे. यामुळे सदरील रॅलीचे आयोजन त्यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते.यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उदघाटन केले. रॅलीची सुरुवात सकाळी 6 वाजता हॉटेल लेमन ट्री, सिडको येथून झाली. सदरील रॅली हर्सूल टी पॉईंट मार्गे सेंट्रल बस स्टॅन्ड ते बाबा पेट्रोल पंप मार्गे परत हॉटेल लेमन ट्री येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या आयोजनात औरंगाबाद सायकलिस्ट क्लब आणि गेट गोईंग या सायकलिंग क्लबने सहकार्य केले. सदरील रॅली राष्ट्रीय स्तरावर स्मार्ट सिटी मिशनतर्फे कोविड महामारीच्या संदर्भात आयोजित होणारी सायकल्स फॉर चेंज मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित केली. यावेळी पाण्डेय म्हणाले की लोक सहभागातून सायकलचा उपयोग फक्त क्रीडा म्हणूनच नव्हे तर दैनंदिन जीवनात प्रवासासाठी देखील होऊ शकतो. सायकलीचा वापर करण्याची मानसिकता विकसित करण्यासाठी भविष्यात देखील या मोहिमेअंतर्गत नवनवीन उपक्रम राबविले जाणार असल्याचे ते म्हणाले.